स्वामीजी अमेरिकेतील परिषदेनंतर तिकडेच काही वषेर् राहिले.
त्यांचे धर्मचक्र प्रवर्तन चालूच होते. 1896 साली ते परत भारतात आल्यावर
त्यांच्या दर्शनासाठी आणि भाषणांसाठी अधीर असणाऱ्या भक्तांचे मेळावे भरू
लागले.
स्वामीजी अंबाला येथे असताना लाहोरच्या खालसा
महाविद्यालयातील गणिताचे एक प्राध्यापक त्यांच्या भेटीसाठी गेले. त्यांनी
बरोबर एक ध्वनिमुदक उपकरण ठेवले होते. मोठ्या सायासाने आणि कौशल्याने त्याचा
वापर करावा लागत असे. या प्राध्यापक महाशयांना मंत्राक्षरत्व लाभलेली
विवेकानंद वैखरी एका रेकॉर्डच्या रूपात आपल्या अभ्यासिकेत ठेवावयाची होती.
त्यांनी आपला मनोरथ सिद्धीस नेला. हे प्राध्यापक होते तीर्थराम गोस्वामी.
काही दिवसांनी स्वामीजी लाहोरला गेले. तेथे स्वामीजींना नाना संप्रदायांची
मंडळी भेटली. लाहोर परिसरात दयानंदांच्या प्रभावाने प्रेरित झालेल्या
आर्यसमाजाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू होते. स्वामीजींना दयानंदांविषयी
आदरभाव होता. मात्र त्यांच्या अनुयायांचे सर्व बाबतींत समाधान करण्याचा
प्रयत्न त्यांनी केला नाही.
रामकृष्णांचे एक शिष्य धन्ना भगत हे त्या
भागात आपले धर्मकार्य करीत होते. त्यांनी अनेकांना अनुग्रह दिला होता.
त्यांच्या परिवारात तीर्थराम गोस्वामी या नावाचा एक बुद्धिमान युवा
प्राध्यापक होता. त्याला विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध लागला होता.
आपल्या महाविद्यालयात त्याने स्वामीजींचे एक व्याख्यान घडवून आणले. या
क्षणाची आठवण म्हणून त्याने स्वामीजींना एक लहानसे घड्याळ भेट म्हणून दिले.
ते घड्याळ कोटाच्या खिशात ठेवता येईल, असे होते. स्वामीजींनी ते पॉकेटवॉच
हाती घेतले आणि परत प्रा. तीर्थराम गोस्वामी यांच्या हाती देऊन स्वत:च
त्यांच्या कोटाच्या खिशात बसवले आणि ते म्हणाले : ''आय विल् वेअर इट इन धिस
पॉकेट.'' या तुमच्या खिशात ठेवून मी ते सतत वापरीन. काही दिवसांपूवीर् अंबाला
येथे भेटलेले तरुण प्राध्यापक हेच होते. पुढे ते स्वामी रामतीर्थ म्हणून
प्रसिद्धीस आले. त्यानी जपानमध्ये आणि अमेरिकेत स्वामीजींप्रमाणेच धर्म,
वेदान्त आणि परमार्थविज्ञान या विषयांवर व्याख्याने दिली. त्यांचे भाषणसंग्रह
“In the woods of God-Realisation”
या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले व मान्यता पावले.
लहानपणी
विवाहित झालेले तीर्थराम पोरवयाच्या आपल्या पत्नीच्या निधनानंतर सर्वार्थाने
विरक्त झाले. गिरिकंदरात राहून त्यांनी साधना केली. काही काळानंतर त्यांनी
प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन आपल्या नि:संग साधनेला आरंभ केला. विवेकानंद
हाच आपला आदर्श मानून त्यांनी धर्मचक्र प्रवर्तनास प्रारंभ केला. जपानमध्ये
आणि अमेरिकेत त्यांनी व्याख्याने दिली. कालान्तराने पूर्ण सन्यास घेऊन
तपश्चरणासाठी ते हिमालयात कायमचे गेले. टिहिरी संस्थानचे अधिपती त्यांचे भक्त
होते. या विरक्त विचारवंताचे त्यांना विलक्षण आकर्षण होते. वैराग्य,
विद्वत्ता, देशभक्तीची ती चालतीबोलती प्रतिमा होती.
जपानमध्ये एक
सर्वधर्मपरिषद होणार असल्याचे वर्तमान देशभर प्रसृत झाले होते. तीर्थरामांनी
विवेकानंदांप्रमाणे या परिषदेत भाषणे करावीत असे टिहिरीच्या महाराजांना
वाटले. रामतीर्थ जपानला जाऊन आले. संकल्पित परिषद झाली नाही. पण रामतीर्थांची
व्याख्याने सर्वत्र होत राहिली. विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व,
चारित्र्य यांनी प्रभावित होणारे रामतीर्थ अनेकांना प्रतिविवेकानंद वाटू
लागले. स्वामीजींप्रमाणेच ते अल्पायुषी ठरले. त्यांनी जलसमाधी घेतली अशी
अनेकांची श्रद्धा आहे. स्नानासाठी ते पाण्यात उतरले, नदीच्या मध्यभागी
असणाऱ्या भोवऱ्यात अडकले. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न न करता ते जागीच
आसनस्थ झाले आणि त्यांनी समाधिमरण पत्करले.
सूर्य, चंदाप्रमाणे या
दोन स्वामींनी अध्यात्माचे आकाश उजळून टाकले. प्रसन्न व्यक्तिमत्व, अमोघ
वक्तृत्व, प्रत्यक्ष साधना, समाजनिष्ठ जीवन, निरामय तत्त्वचिंतन आणि धर्मचक्र
प्रवर्तनाची अदम्य आकांक्षा या गुणसंपदेमुळे भारतीयांच्या अभिमानाचा विषय
झालेले हे दोन श्रीमंत योगी परस्परांशी असे संलग्न होते. दोघांच्याही
अभ्यासकांची, उपासकांची एक परंपरा निर्माण झाली. पंडित मदन मोहन मालवीय, डॉ.
महंमद इकबाल, ऋषिकेशचे शिवानंद, नारायण स्वामी रामतीर्थांचे अनुयायी होते.
भगिनी निवेदिता पासून स्वामी रंगनाथानंदापर्यंतचा विवेकानंद परिवार सर्वज्ञात
आहे. दोन निष्कांचन विरक्तांनी देश श्रीमंत केला. 'तपस्या' या जीवनमूल्याचे
अखंड मंडन केले.
(
क्रमश:)
-
प्राचार्य शिवाजीराव भोसले