मॅडम हेल यांनी स्वामींना अल्पकाळ घरी थांबवून घेतले.
त्यांची विचारपूस, आगतस्वागत केले. आवश्यक त्या सर्व आन्हिकांची पूर्तता
झाली. त्यानंतर त्यांनी स्वामींना परिषदेच्या कार्यालयापर्यंत सोबत केली.
प्रा. राईट यांच्या पत्रामुळे पुढची सर्व व्यवस्था पुरी होऊन सर्व जण
स्वामीजींच्या प्रतिक्षेत होते.11 सप्टेंबर 1893 हा ऐतिहासिक दिवस उगवला.
परिषदेच्या संकल्पित वेळी आरंभसूचक शुभ घंटा घणघणू लागली. सर्व धर्मप्रतिनिधी
व्यासपीठाच्या दिशेने निघाले. अल्पावधीत आपआपल्या नियोजितस्थानी जाऊन आसनस्थ
झाले. व्यासपीठ बहरले. सभागृह मोहोरले.
आरंभी पदाधिकाऱ्यांची प्रास्ताविक व स्वागतपर भाषणे झाली.
मग धर्मप्रतिनिधींचा परिचय व त्यांचे प्रास्ताविक मनोगत या कार्यक्रमास आरंभ
झाला. ही सर्व लहान लहान भाषणेच होती. मुख्य भाषणे नंतर होणार होती. हा केवळ
पूर्वरंग होता.पहिल्या परिचयपर भाषणासाठी, आरंभीच्या आत्मनिवेदनासाठी,
सर्वांनीच एका अनुक्रमाने बोलणे अपेक्षित होते. स्वामीजी हा प्रसंग लांबणीवर
टाकत होते. शेवटी असा एक क्षण आला की, पुढे अवकाश उरले नाही, पर्याय उरला
नाही. बोलणे अगदी अटळ होते.स्वामी उठले, उभे राहिले. त्यांनी सर्वांना
अभिवादन केले आणि ते सहज बोलून गेले : ''
Sisters and Brothers of America. '' हे
साधे सरळ शब्द स्वामींच्या मुखातून बाहेर पडताच अवघे सभागृह हेलावले.
एका अनामिक आनंदाच्या लहरी उठल्या आणि सभागृह अक्षरश: दुमदुमले.
श्रोते वक्त्याला अभिवादन करण्यासाठी जे उभे राहिले ते आनंदाने भान हरपून
गेले. दोन मिनिटे टाळ्यांचा कल्लोळ चालूच राहिला. अमर्याद आनंदाचा अखंड गजर,
पुढे काय? या अधीरतेच्या गाभाऱ्यात विराम पावला.पुढे सुमारे पाच मिनिटे
स्वामीजी बोलत राहिले. त्या भाषणाच्या एका मिनिटात युगाचे ऐश्वर्य सामावले
होते. त्या पाच मिनिटांच्या सहज प्रास्ताविकाने झंकारलेली मने आतून निनादत
राहिली. या पाच मिनिटांत स्वामीजींनी काय सांगितले?कमीत कमी शब्दांत अर्थाची
सरोवरे कशी निर्माण होतात, त्याचे ते एक प्रात्यक्षिक होते. या जगाच्या
इतिहासात आकाराने लहान पण विचारांचे आकाश व्यापणारी दोन भाषणे गाजली. पहिले
ते अब्राहम लिंकन यांनी गेट्सबर्ग येथे केलेले भाषण. दुसरे ते स्वामीजींचे
शिकागो परिषदेतील पहिलेच भाषण. लिंकन यांनी आपल्या भाषणात केलेले लोकशाहीचे
चित्रण अजूनही अभ्यासकांच्या अंतर्यामी कोरलेले आहे. स्वामीजींचे सुरुवातीचे
शब्द होते : ''सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका'' या मंतरलेल्या शब्दांनी
श्रोते हेलावले, भारावले. त्याच क्षणी झंकारलेले सात हजार श्रोते उठून उभे
राहिले. स्वामींना अभिवादन करण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे आचरलेला तो
समूहधर्म होता. वाद्यवृंदाप्रमाणे श्रोतृवृंदालाही ताल-सूर सापडतो. भारतातील
आपल्या प्राचीनतम धर्माचा उल्लेख करताना स्वामींनी त्याला ''मदर ऑफ ऑल
रिलिजन्स'' असे म्हटले.जगातील सर्व धर्मांतील सत्वांश सन्मानपूर्वक मान्य
करणारा आणि काळाच्या अपेक्षेने सर्वांत पुरातन असा जो धर्म त्याचा प्रतिनिधी
म्हणून मी आपल्यापुढे उभा आहे.''आजवर धर्माच्या नावाने अधर्म घडला. प्रसंगी
संहारक संघर्ष घडला. या आततायीपणापासून मुक्त आणि सर्व धर्मांविषयी आदराची व
सन्मानाची भावना बाळगणारा उदारमनस्क असा एक प्राचीन धर्म ''हिंदू धर्म''
म्हणून ओळखला जातो. आम्ही हिंदू असे मानतो की, जगातील सगळेच जलप्रवाह जसे
समुदाला मिळतात, तसे सर्व धर्मप्रवाह सर्वकल्याणाच्या सागरात विसजिर्त
होतात.''स्वामीजींचे विचार आणि शब्द यांचे सौंदर्य श्रोत्यांना एका वेगळ्याच
जगात घेऊन गेले. ते म्हणाले : ''
I am
proud to belong to a religion which has taught the world both tolerance
and universal acceptance. We believe not only in universal totertion, but
we accept all religions as true... 'हे सगळे भाषण आज उपलब्ध आहे.
स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द टिपला गेला, हे मानवकुलाचे
भाग्य होय. विवेकानंदांचे समग्र साहित्य वारंवार मुदित आणि प्रकाशित करण्याचे
पुण्यकर्म हिमालयात असणाऱ्या मायावतीच्या अद्वैत आश्रमाने केले आहे.
प्रकाशन, प्रसिद्धी आणि वितरण यांच्या सोयीसाठी हे काम हल्ली कलकत्ता
येथे केले जाते.स्वामीजी जन्मभर बोलत गेले. जाणते अभ्यासक त्यांचे शब्द झेलत
गेले. लगोलग त्यांची बांधणी करून ग्रंथांची उभारणी घडली. त्यांची किती वेळा
आवर्तने घडली, ते सांगणे अवघड.भारतातील सर्व प्रमुख भाषांतून या साहित्याचे
अनुवाद उपलब्ध आहेत. जगातील सर्व देशांत विवेकानंद पोहोचले आहेत. हे भाग्य
फारच थोड्या विचारवंतांच्या वाट्याला आले असावे.मात्र आश्चर्य असे की, 1893
साली ध्वनिमुदणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. ध्वनिवर्धक हेसुद्धा
भोंग्याप्रमाणे सुमार होते. मुदणकला मात्र विकसित झाली होती. वर्तमानपत्रे
आपले काम करीत होती. वार्ता देशाची सरहद्द ओलांडून परदेशी पत्रांच्या
रकान्यात प्रकट होत असत. हे सर्व अपेक्षित त्या त्वरेने घडत नव्हते इतकेच.
लिहिण्याचा आळस नव्हता. मोठ्या तत्परतेने व उत्साहाने संवाद व भाषणे लिपिबद्ध
करण्याची ऐपत अनेकांच्या अंगी होती. स्वामीजींचे श्रोते, भक्त, अभ्यासक,
लेखनिक आणि पत्रकार हे लहान मुले जशा गारा गोळा करतात, त्याप्रमाणे
स्वामीजींच्या विचारधारांचे संकलन करीत असत. त्यात एक आनंद होता. ती सजीवतेची
पालवी होती. यंत्रगौरवापेक्षा जीवनवैभवाचा वाटा त्यात मोठा होता.
(क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले