राजयोग - प्राचार्य शिवाजीराव भोसले

टॉलस्टॉय हे एक विख्यात लेखक होते. ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या या महापुरुषाचा महात्मा गांधींच्या जीवनावर बराच प्रभाव पडला होता. नि:संग आणि निरासक्त जीवन जगणारा तो एक रशियन ऋषी होता. संपत्तीच्या आसक्तीतून जगातील अनेक प्रलय निर्माण झाले असे या महापुरुषाचे मत होते. गरजेपुरते धनधान्य, निवारा, कपडेलत्ते जवळ ठेवून माणसांनी सुखाने जगावे असे त्याला वाटे. वाट्याला आलेली उदंड धनसंपदा आणि शेतीवाडी श्ामिकांना वाटून विरक्त होणारा हा एक आचारशुद्ध तत्ववेत्ता होता.

त्याने स्वामी विवेकानंदांचा 'राजयोग' हा ग्रंथ वाचला. त्यामुळे तो अतिशय प्रभावित झाला. नंतर त्याने सर्वांना कळकळीचे आवाहन केले की : आयुष्यात एकच ग्रंथ वाचणार असाल तर तो विवेकानंदांचा 'राजयोग' असू दे.

स्वामीजींनी संकल्पपूर्वक या ग्रंथाची सिद्धता केली होती. माणसाच्या ठायी असणाऱ्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घडावा यासाठी त्याने आपली साधना कशी करावी याचे मार्गदर्शन या ग्रंथात आढळते. 4 जुलै 1908 या दिवशीच्या आपल्या नित्य नोंदवहीत टॉलस्टॉय म्हणतात : I read the wonderful writing of Vivekanand on God; this should be translated. I intend to do it myself.

नोबेल पारितोषिकाच्या एका मानकऱ्याला, विज्ञानयुगातील एका ऋषिवर्यास, विवेकानंदांनी वेडे केले हे कोणाला खरे वाटणार नाही. टॉलस्टॉय हा विश्वविख्यात असा लेखक होता. विवेकानंद हे कलकत्ता विद्यापीठाचे एक युवा पदवीधर होते. त्यांची वाणी आणि लेखणी तेजस्वी होती. जरी विवेकानंदाचे समग्र साहित्य उपलब्ध झाले नाही तरी त्यांचा एकच ग्रंथ अनेकदा वाचावा. तो म्हणजे ''राजयोग'', त्यांचा आणखी एखादा ग्रंथ वाचणे शक्य असेल तर तो असावा. 'लेटर्स ऑफ विवेकानंद''.

त्यांच्या पत्रात त्यांचे मन दिसते. राजयोगात वाचकाला आपले मन भेटते. समर्थांनी ज्या 'मना सज्जना' स आवाहन केले आणि भगवंतांनी ज्याला बंधन आणि मोक्ष याचे मूळ म्हटले ते 'मन' राजयोगाच्या अभ्यासाने पावन होते.

या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात पातंजल योगसूत्रांचे विवेचन आहे. सावकाशीने, एकाग्रतापूर्वक त्यांचे अध्ययन केल्यास अभ्यासकाला आत्मप्रभुत्वाची वाट सापडेल.

शाळा, कॉलेजच्या पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांच्या हाती हे पुस्तक जावे. टी. व्ही. पुढे स्थानबद्ध होणारी मुले कदाचित राजयोगाच्या अभ्यासाने आत्मरत, आत्मतृप्त होतील. आत्मबोधामुळे आत्मपर्याप्त होतील. या संदर्भात थोडे आत्मकथन करण्याचा मोह पडतो आहे. वयाच्या तेराव्या वषीर् सातारच्या नगरवाचन मंदिरात 'राजयोग' नावाचे पुस्तक ग्रंथापालाच्या आग्रहास्तव मी घरी नेले. पहिल्या वाचनाने मला ते धूसर, अवघड पण तरीही आकर्षक वाटले. नंतर काळाच्या ओघात त्याचा थोडा विसर पडला. पुढे तत्त्वज्ञान या विषयाचा विद्याथीर् म्हणून वर्गात बसलो आणि गुरूवर्य प्राचार्य सोनोपंत दांडेकरांनी एका तासाला सर्वांना विवेकानंद स्मरण घडवले. मला ते म्हणत : तू 'राजयोगी' वक्ता हो. हा एकच विषय अभ्यासपूर्वक लोकांना समजावून दे. मामा मोठे होते. हा विषय फारच मोठा होता. मी मुलखाचा लहान होतो.

आज या वयात या ग्रंथाचा मोठा आधार वाटतो. त्यातले जमेल एवढे आचरतो. तसा मी एक सामान्य साधक आहे.

कॅलिफोनिर्यात योगानंदाचा एक आश्ाम आहे. तो भारतीय क्रियायोगी तेथे समाधिस्थ झाला. त्या आश्ामात मला स्वामीजींचा फोटो दिसला. त्यानंतर स्वामीजींच्या शांति आश्ामात जाणे घडले तेथे एक अमेरिकन विद्याथिर्नी स्वामीजींच्या राजयोगाच्या आधाराने आपली साधना करीत असल्याचे आढळले. ते पाहून नवल वाटले. आम्ही भारतीय 'स्वामी भारताचे! पतंजली आपलेच! पण अभ्यासाच्या वाटेने जावे असे वाटत नाही.

राजयोग हा ग्रंथ शास्त्रज्ञाच्या अलिप्ततेने पण अभ्यासकाच्या अगत्याने जरूर वाचावा. त्यातला सहज प्राणायाम कोणीही करून पहावा. एका जागेवर आसनस्थ होऊन पहावे. एखाद्या प्रतिमेकडे पहावे. मग डोळे मिटावे. मनाने त्या प्रतिमेचा वेध घ्यावा. नंतर तेही विसरावे. अगदी शांत आणि स्वस्थ व्हावे.

रातराणीचा निराकार सुगंध सुखदायक वाटतो. मनातही अशा सुखद लहरी निर्माण होत आहेत असे वाटेल. हळूहळू अंतर्यामी असणारे अस्मितेचे अधिष्ठान भासमान होईल. अथांग आकाशात दिसणाऱ्या चंदाचे दर्शन घडल्यासारखे वाटेल.

जे घडेल ते घडू द्यावे. जे वाटेल ते वाटू द्यावे. आपणच आपल्या ठायी विरून जावे. हे विरणे सरेल व मागे उरेल त्याला काय म्हणावे?

हे ज्ञानदेवांना किंवा विवेकानंदांना विचारावे लागेल. कदाचित कोणालाही न विचारता काय ते उमगेल.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले