विवेकानंदाना चारी धामांची यात्रा पुरी करावयाची होती. तो
त्यांचा संकल्प होता. रामेश्वर पाहून झाल्यावर पुढचा विचार करता येईल, असे ते
म्हणत. त्यांना मुंबईचे आकर्षण होते. पुणे पाहावयाचे होते. कोल्हापूर,
बेळगाव, बंगलोर, म्हैसूर या नगरांविषयी कुतूहल होते. गोव्यात मडगावजवळ राचेल
या गावी एक ख्रिश्चन सेमिनरी आहे, ती ग्रंथसमृद्ध आहे, तेथे काही फादर्स
अभ्यासपूर्वक काळ कंठीत आहेत. त्यांच्या संगतीत थोडे रहावे असे पण वाटे.
स्वामीजींच्या प्रवासकाळात दोन ग्रंथ त्यांच्या सोबत असत. ''गीता'' आणि थॉमस
केम्पी या लेखकाचे ''इमिटेशन ऑफ ख्राईस्ट'' हे ते दोन ग्रंथ होत. गीता तर पाठ
होती. दुसरे पुस्तक मनात घर करून त्यांच्याबरोबर प्रवास करत होते.
बेळगावला हरिपद मित्र व कायदेपंडित भाटे यांच्याकडे ते
राहिले होते. हरिपद मित्रांच्या निवासस्थानाची जागा ताब्यात घेऊन रामकृष्ण
मठाची एक भव्य वास्तू नुकतीच तेथे उभी करण्यात आली आहे.
म्हैसूरच्या
राजवाड्यात स्वामीजींच्या एका भाषणाचे ध्वनिमुदण करण्याचा प्रयत्न तेथील
महाराजांनी केला. पुढे ते भाषण पुसट होऊन लोप पावले. शिकागोची धर्मपरिषदही
ध्वनिमुदण कक्षेत येऊ शकली नाही. तो काळ एवढा अनुकूल नव्हता.
मडगाव
येथे स्वामीजींचे भव्य स्वागत करणारे सुब्राय नायक यांची वास्तू व
स्वामीजींसाठी राखून ठेवलेली एक खास खोली अजूनही साक्षीत्वाने उभी आहे.
दक्षिण भारतात संचार करताना कोठून कोठे जावयाचे याचे गणित
स्वामीजींना मांडता येत नव्हते. वाट फुटेल तशी आणि पाय नेतील तिकडे जात
रहावयाचे एवढाच एक कार्यक्रम होता. कोठे आदरसत्कार घडे. कोठे दुर्लक्ष घडे.
अपेक्षा आणि उपेक्षा यापासून मुक्त असणारे मन ही एक शक्ती असते. ते कोठे अडत
नाही, नडत नाही.
या प्रवासपर्वाची समाप्ती कन्याकुमारी येथे घडली.
कन्याकुमारी हे देशाच्या दक्षिण सीमेवरचे अखेरचे स्थानक तीन सागरांचे
संगमस्थान!
या संगमस्थानावर समुदाच्या मध्यभागी पाण्यातून डोकावणारा
एक मोठा खडक आहे. त्याचे क्षेत्रफळ चार एकरांचे आहे. बेटासमान वाटणाऱ्या या
खडकावर काही क्षण विहार करावा. तेथून सारा परिसर डोळे भरून पहावा, असे
स्वामीजींना वाटले. किनाऱ्यापासून खडकापर्यंत जाणाऱ्या नावा होत्या; पण
त्यांना देण्यासाठी मोबदला जवळ नव्हता. जवळ काहीच नसणे हीच विरक्ताची ठेव.
त्या मन:स्थितीत स्वामीजी पाण्यात उतरले व पोहत पोहत त्या खडकापर्यंत गेले.
मदतीच्या भावनेने काही नावाडी मागून धावले. दरम्यान स्वामी खडकावर जाऊन उभे
राहिले.
एका आतिथ्यशील नावाड्याने स्वामीजींच्या खाण्या-पिण्याची
चौकशी केली. त्यावर स्वामींनी एवढेच सुचविले की, ''शक्य झाल्यास थोडे दूध आणि
फळे जवळ आणून ठेवा. मला शांतपणे बसू द्या, विचार करू द्या. माझा मी माझ्या
सवडीने परत फिरेन. काही मदत लागली तर तुम्हाला हाक मारीन.''
या
खडकावर स्वामींजी तीन दिवस थांबले. अवघा भारत पाहून फिरून झाला होता.
रामकृष्णांच्या चरणी थांबणे घडले होते. देवीचे दर्शन झाले होते. समाधिसुख
अनुभवले होते. आता यापुढे काय? या नंतर काय?
या प्रश्ानचे उत्तर
कन्याकुमारीच्या खडकावर बसून केलेल्या चिंतनातून स्फुरले. या क्षणापर्यंत आपण
आपल्याच आकांक्षांचा भार वाहिला. देवदर्शन, समाधिसुख, गुरुकृपा, भक्ती,
मुक्ती हे सगळे मीपणाच्या परिघात अडकून पडले होते.
गेली तीन वषेर्
देशभर फिरलो. माझ्या या देशाला मी काय दिले? हजारो निरक्षर, अज्ञ, दीन
स्त्री-पुरुषांाठी मी काय केले? आता येथून पुढे जन्मभर मी मातृभूमीच्या
ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीन. भारताची आणि भारतीयांची सेवा हाच माझा
धर्म राहील.
-
प्राचार्य शिवाजीराव भोसले
( क्रमश:)