रामकृष्णांनी वारंवार सांगितले की, मानवसेवा हीच माधवसेवा
आहे. स्वामीजी दोन पावले पुढेच गेले आणि म्हणाले की, या देशातील एखादा कुत्रा
उपाशी आहे तोपर्यंत त्यांच्या मुखात अन्नाचा घास पडेल याचा विचार म्हणजे
धर्म. भूतदया नव्हे, तर भूतमात्राची सेवा, हाच धर्माचा आत्मा होय.
आजवर धर्मचिंतन व धर्मविवेचन एकाच दिशेने होत गेले.
साधकांचा मोक्ष, भक्तांची मुक्ती, दीक्षितांचे कल्याण हीच धर्माची उद्दिष्टे
मानली गेली. या परीघाबाहेरची विराट सृष्टी धर्मक्षेत्राबाहेर राहिली. धर्म
आहे तो जीवसृष्टीच्या कल्याणात! सगळे जीव परस्परांचे सोयरे आहेत. ऐन अरण्यात
हरणांचे थवे, हत्तींचे कळप, वनगाई आणि वासरे विहार करतात. साधुसंत, मुनिजन,
ऋषिकुले, आचार्यांचे आश्ाम, दार्शनिकांच्या पाठशाळा व अभ्यासिका हे सर्व
जीवसृष्टीवैभव रानावनातच असते ना? मग परस्परांची फारकत करून जगणे ही कोठली
रीत? ''अवघी भूते साम्याआली'' हे संतांनी अनुभवलेले सत्य आहे. त्याचे
पुनरावर्तन घडले पाहिजे. व्यक्तिगत मुक्तीचा विचार सोडून सर्व कल्याणासाठी
संन्यास घेणारांचा संघ ही काळजी गरज आहे. भारतातील सर्व धर्मपंथांतील विरक्त
व साधू लोकसेवेच्या ध्वजाखाली संघटित झाले पाहिजेत. पण या साधूंनी निर्वाह
कसा करावयाचा? त्यांना आधार कोण देणार? अटळ अशा ऐहिक पौरुषाचे पाठ त्यांना
देणारी एखादी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. व्रतस्थ आणि संन्यस्त युवक हेच तिचे
बलस्थान असले पाहिजेे. अशा यंत्रणेचे चलनवलन आणि अभिसरण आपोआप का घडणार आहे?
त्याला अर्थबळ हवे, ज्ञानबळ हवे! हे संपादन करण्याच्या इषेर्ने काही प्रगत
राष्ट्रांशी संपर्क साधून त्यांना मदतीसाठी आवाहन केले पाहिजे. हे काम जागेवर
बसून होणार नाही. त्यासाठी प्रसंगी जगभर संचार करण्याची तयारी हवी. भारत मी
पाहिला आहे. उरले जग नजरेस पडले पाहिजे. नियतीनेच तसा संकेत दिला होता.
अमेरिकेत एक जागतिक विज्ञानयात्रा भरणार होती. तिच्याशी संलग्न अशी धर्मसभा
भरणार होती. माणसे माणसांना भेटणार होती. माणसांच्या या तीर्थस्थानी आपण जावे
व आपले मंत्र मोठ्याने जपावे असे स्वामीजींना वाटले.
अमेरिका खंडाचा
शोध लागून चारशे वषेर् झाली होती. चारशे वर्षांपूवीर् काही अप्रगत आणि
अविकसित जीवांनी व्यापलेला हा भूप्रदेश आता मजलेदार संस्कृतीने सजला आहे.
माणसांनी अस्मानभरारी घ्यावी, आभाळाला शिडी लावून नक्षत्रे खुडून आणावी एवढी
मजल मारली आहे. या कर्तृत्वाचे जगाला दर्शन घडावे यासाठी आपणच एखादे विराट
विश्वप्रदर्शन भरवावे असे तेथील काही जाणत्या जीवांना वाटू लागले. अॅडव्होकेट
बॉनी नावाचे एक गृहस्थ हाती सुकाण घेऊन विचारनौका पुढे नेत होते. या
विचारयात्रेत धर्मविचारांची दखल घेतली पाहिजे असा एक आग्रह जोराने पुढे आला.
त्यासाठी जागतिक सर्व धर्मपरिषद पण भरविली पाहिजे. या जगात धर्म अस्तित्वात
आला म्हणून माणूस जागेवर राहिला. धर्म म्हणजे तरी काय? जो पशूला माणूस करू
शकेल व माणसाला देवपण मिळवून देईल तो खरा धर्म. जीवनातून धर्म वगळला तर मागे
काय राहील? धर्म हा आतून स्फुरणारा व बाहेर वाहत राहणारा एक विचारप्रवाह
असतो. या विचारप्रवाहाकाठी मानवी गुणसंपदेची गावे वसली. हे सत्य स्वीकारून
विज्ञान प्रदर्शनाला धर्म परिषदेची एक किनार जोडावी असा निष्कर्ष निघाला.
जगातील सर्व प्रमुख धर्मांचे दर्शन एका व्यासपीठावरून घडेल अशी व्यवस्था
करावी. तिला 'पार्लमेंट ऑफ रिलिजन्स' हे नाव द्यावे. या सर्व संयोजनाची व
सारथ्याची जबाबदारी काही धर्मवेत्त्यांनी घ्यावी.
या ध्यासातून एक
धर्मविचारसभा अस्तित्वात आली. तिची कार्यालये दूरदेशी उघडण्यात आली. भारतात
पण ती उघडली गेली. या सभेत आपल्या धर्माची व प्रतिनिधीची रीतसर नोंदणी सुरू
झाली. भारतात या धर्मसभेचे कामकाज रीतसर सुरू झाले. प्रत्येक प्रांतात एक
उपकार्यालय थाटले गेले. त्याकाळी विरळ असणाऱ्या विख्यात वर्तमानपत्रात ही
बातमी येऊन गेली. मदासच्या 'दि हिंदू' या पत्राने तिला प्रसिद्धी दिली; पण
तिचे नेमके स्वरूप समजून घेणारे व समजावून देणारे थोडेच होते. तरी तिची
अनेकांना कुणकुण लागली होती. अधूनमधून तशी गुणगुण होत होती.
स्वामी
विवेकानंदांच्या भारतयात्रेत त्यांना अनेक मोठी माणसे भेटली. त्यात काही
विद्वान होते. संस्थानिक होते. पोरबंदरचे प्रशासक शंकर पांडुरंग पंडित हे तर
दोन वेळा युरोपमध्ये राहून आले होते. त्यांचे स्वत:चे एक प्रचंड ग्रंथालय
होते. वैदिक वाङ्मयाची जगाला परिचय घडावा असे त्यांना वाटत असे; पण घडणार
कसा? संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे आणि इंग्लिशमधून वक्तृत्वपूर्ण विवेचन
करू शकणारे समर्थ प्रतिपादक आणावयाचे कोठून? योगायोगाने त्यांना एक
चालताबोलता ज्ञानकोश दिसला. त्यांच्या नजरेत तो भरला. त्यांनी स्वामींना 11
महिने आपल्याकडे आग्रहपूर्वक ठेवून घेतले. स्वामींच्या भारतभ्रमणात हा
महत्त्वाचा काळ ठरला. या पंडितांनी स्वामींना समजावून दिले : केवळ असे फिरत
राहून पदरी काय पडणार? हे विचार, हे अनुभवधन जगाच्या नजरेस पडले पाहिजे.
त्यासाठी जगाला सामोरे झाले पाहिजे. भारताबाहेर पडून भारताची थोरवी लोकांना
समजावून दिली पाहिजे. नजीकच्या भविष्यकाळात अमेरिकेत एक 'सर्वधर्मपरिषद'
भरणार आहे. तिच्याकडे लक्ष असू द्या. त्या रोखाने पावले पडू द्या.
या
कल्पनेची आवर्तने अधूनमधून होत राहिली. स्वामींच्या मनात तिने घर केले; पण
तिचा तपशीलवार व सुसंगत विचार त्यांनी कधीच केला नाही. ज्याला पाठपुरावा
म्हणतात तो घडला नाही. देवदर्शन व देशदर्शन या प्रेरणा प्रभावी होत्या; पण
त्यांना व्यवहाराची बैठक नव्हती.
भारतातील अन्य धर्मांनी आपली तयारी
करून ठेवली होती. त्यांचे प्रतिनिधी निश्चित केले होते. धर्मपाल हे बुद्ध
धर्माचे प्रतिनिधित्व करणार होते. श्ाी. गांधी हे जैनधर्माचे प्रवक्ते होते.
डॉ. अॅनी बेझंट थिऑसफीविषयी बोलणार होत्या. श्ाी. मुजुमदार हे त्यांचे एक
सांगाती होते; पण 'हिदुस्थान' या नावाने जगाच्या नकाशात शोभून दिसणारे एक
राष्ट्र, ज्या धर्माचा अभिमान बाळगत होते त्या हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण?
हा प्रश्ान् दुर्लक्षित राहिला. आंधळा अभिमान आणि कमालीची अनास्था यामुळे
कोणी फारसा विचार करीत नव्हते. त्यातून धर्मपरिषद ही समुदाच्या पलीकडे भरणार
होती. समुदाचे उल्लंघन निषिद्ध मानले जाई. कर्मठांचा तर कडवा विरोध होता.
किनारा सोडावयाचा नाही, देश ओलांडावयाचा नाही. अशा डळमळीत अधिष्ठानाचा आधार
लाभणार कसा?
(
क्रमश:)
-
प्राचार्य शिवाजीराव भोसले