आपली मुले लहानाची मोठी होत असताना त्यांच्या भविष्याचा
आराखडा तयार केला जातो. ती त्याप्रमाणे घडतील आणि वाढतील, असे गृहीत धरले
जाते. पालकांप्रमाणे मुलांच्याही ठायी इच्छाशक्ती असते हे आपण विसरून जातो.
विवेकानंदांना त्यांच्या वडिलांनी इच्छास्वातंत्र्य दिले
होते. त्यांनी पुढे कोण व्हावे आणि काय करावे, या संदर्भात वडिलांनी
मार्गदर्शक आराखडा तयार केला नव्हता. वडील हे कलकत्त्याच्या हायकोर्टात
आपल्या कायदेपांडित्याने तळपत होते. मुलाचा मार्ग मुलानेच ठरवावा असे त्यांचे
मत होते.
कलकत्ता हे त्या काळी भारतातील सर्वात प्रगत नगर मानले जात
असे. इंग्लिश लोकांनी निवडलेली पहिली राजधानी ती होती. इंग्लिश राज्यकतेर्
भारतात प्रथम स्थिरावले ते बंगालमध्ये. आपली न्यायालये, महाविद्यालये,
विद्यापीठे त्यांनी कलकत्त्याच्या पंचक्रोशीत स्थापन केली.
इंग्लिश
लोकांचे वैशिष्ट्य असे की, माणसांची निवड करताना गुणवत्तेच्या बाबतीत ते
तडजोड करीत नसत. राज्यर्कत्यांच्या आश्रयाने काही विदेशी शिक्षणसंस्था
कलकत्त्यात वाढीस लागल्या. उत्तम ग्रंथालय, जाणते प्राध्यापक, काटेकोर
मूल्यमापन, पारदर्शक परीक्षण आणि मूल्यमापन ही त्यांच्या शिक्षणसंस्थांची
वैशिष्ट्ये होती.
विवेकानंद हे कलकत्त्यात शिकले. त्यांनी वर्गातील
व्याख्याने लक्षपूर्वक ऐकली. प्रत्येक विषयावरचे प्रातिनिधिक ग्रंथ मुळातून
वाचले. त्याकाळी गाइड, टिपणे, खाजगी वर्ग यांचा प्रभाव नव्हता.
ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात तडजोडीची वार्ता नव्हती. अभ्यासपूर्वक संपादन
केलेले ज्ञान हे व्यक्तिमत्त्वाचे भूषण मानले जात असे. प्रत्येक
शिक्षणसंस्थेचे एक क्रीडांगण, ग्रंथालय आणि व्यायामशाळा असे. विवेकानंद हे एक
स्कॉलर होते. तसेच ते क्रीडानिपुण युवक होते. तो सतत बहरणारा, मोहरणारा
चैतन्यवृक्ष होता. आपल्या भविष्याच्या संदर्भात त्यांनी काही निर्णय उपजत
बुद्धीने घेतले होते. लग्न करावयाचे नाही, संसार थाटावयाचा नाही, जमा आणि
खर्च यांचा विचार करीत बसावयाचे नाही. जगणे म्हणजे काय, हे जाणून घ्यावयाचे.
जगणे हा एक अनुभव आहे. या अनुभवाचा अन्वयार्थ लावण्याइतके आनंददायक काय असू
शकेल? पण तो अर्थ न लागल्यामुळे वाट्याला येणाऱ्या वेदना आणि यातना किती काळ
सहन करावयाच्या?
त्यापेक्षा रमतगमत, गम्मत जम्मत करीत काळ काढला तर
काय होईल? जगण्यात रमणे जमावे. मागच्या पिढीत आपल्या अगोदर जन्माला आलेली,
मान्यता पावलेली माणसे समाजात आहेत. त्यांचे थोडे मार्गदर्शन घेतले तर?
त्यांचे ग्रंथ अभ्यासले तर जीवनमार्गावरची चार पावले तरी पुढे पडतील. मिल्ल
आणि स्पेन्सर, कांट आणि शंकराचार्य अशा प्रचंड बुद्धिमंतांना असेच काही जाणवत
होते. त्यांनी आपली मानसिक आंदोलने अक्षरबद्ध केली. त्यांची ग्रंथसंपदा
उपलब्ध आहे. त्यांच्या अक्षरसंपत्तीमुळे जग श्रीमंत झाले. त्या आधारे
आपणसुद्धा विचारश्रीमंती संपादन करू शकू.
जीवनाच्या भव्यतेने भारावून
जाणे आणि भव्यतेत आढळणारे रितेपण ध्यानी येताच अस्वस्थ होणे, असा विचित्र
स्वभाव स्वामीजींच्या वाट्याला आला होता.
त्यांच्या जीवनातील संक्रमण
काळात आपल्या भाषाप्रभुत्वाने, चिंतनशीलतेने, ब्रह्माचिंतनाने समाजाला प्रिय
झालेले केशवचंद सेन त्यांना काही काळ भावले.
देव हवा पण देव्हारा
नको; जाती नकोत, वर्ण नकोत, गुरू नको, स्त्री-पुरुषांचा अधिकार समान असावा.
स्वामीजींना हा सूर आवडला. ज्याच्या बासरीतून हा सूर निघत होता तो
स्वत:च एका भोळ्या भक्तावर भाळला होता. वृंदावनात मशीद बांधून, शेजारी एक
चर्च उभे करून, जवळच्या मंदिरात जाऊन निराकाराचे भजन करावे, असे स्वप्न
दिवसाउजेडी पाहणारा एक अवलिया त्या काळच्या कलकत्त्यात होता. त्याला लोक
परमहंस म्हणत. केशवचंदांना या साधू पुरुषाचे आकर्षण होते.
आपण स्वत:
त्याच्या भेटीसाठी जाणे व इतरांनाही बरोबर घेऊन जाणे, हा त्यांच्या जीवनातला
एक आनंंदसोहळा होता. तो वारंवार साजरा होई.
आरशात किंवा जलाशयात
आभाळाचे प्रतिबिंब दिसावे, त्यातली नक्षत्रे दिसावीत, चंदसूर्याचा प्रकाश
भासमान व्हावा, त्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस नावाच्या एका अनुभव दर्पणात एक
विशाल विश्व दिसत होते. त्यात सर्व अनुभवतीथेर् होती.
स्वामी
विवेकानंदांनी या विश्वात वास्तव्य केले. याच विश्वात त्यांनी श्वास घेतले
आणि सोडले. या श्वासातून त्यांनी काही स्पंदने अनुभवली. ही स्पंदने शब्दबद्ध
झाली आणि त्यातून भक्तियोग नावाचा ग्रंथ प्रकट झाला.
भक्ती आणि
मुक्ती या एकाच नावाच्या दोन बाजू होत्या. एकाच अनुभववृक्षाच्या दोन फांद्या
होत्या. या अनुभववृक्षाच्या मुळाशी योग होता. त्याचा कणखर खोड शुद्ध
ज्ञानस्वरूप होता. स्वामींना या चैतन्यवृक्षाच्या सावलीचे आकर्षण वाटले.
( क्रमश:)
- प्राचार्य
शिवाजीराव भोसले