अभिनव योगाचे आचार्य विवेकानंद - प्राचार्य शिवाजीराव भोसले

विवेकानंद हे काही बाबतीत आग्रही आणि निग्रही होते. त्यांचे माणसांवर प्रेम होते. हे अगत्य माणूसपणाविषयीचे होते. माणूस हे अनेक सद्गुणांचे मंदिर आणि अभिव्यक्ती स्थान आहे. फळांना व फुलांना त्यांचा स्वाद आणि गंध असतो. मनुष्यत्व हे असेच एक स्वाभाविक रूप आहे.

व्यसने, चैन, डामडौल या सर्व बाबी वृथा आहेत. ज्याला आपण जीवनमान म्हणतो त्याला निर्मलतेचे अधिष्ठान असावे. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी हा जीवनसंगीतातील महत्त्वाचा सूर आहे. ही तत्त्वांची रागदारी आहे.

रात्री अपरात्री मजलेदार इमारतीत होणाऱ्या मैफली ही शिथिलता आहे. वेळीच झोपी जाऊन ब्राह्मा मुहूर्तावर उठावे, पवित्र विषयाचे चिंतन करावे. मोकळ्या हवेत प्राणायाम करावा, अर्थपूर्ण स्तोत्रांचे अथवा ग्रंथाचे परिशीलन करावे. असे आग्रह धरण्यात जर मागासलेपण असेल तर स्वामीजींना ते प्रिय होते.

आपल्या मठात पहाटेची घंटा वाजताच ते उठून, आवश्यक त्या गोष्टी उरकून, मंदिरात जाऊन बसत. त्यांचे सर्व गुरुबंधू त्यांच्या पाठोपाठ त्वरेने आसनस्थ होत. स्वत: स्वामीजी दोन-तीन तास अगदी निश्चल रहात. ते ध्यानयोगी होते.

एखादा अवघड विषय, प्रमेय किंवा ग्रंथ ध्यानानंतर अभ्यासासाठी निवडला तर त्याची लवकर उकल होते. आपल्या जीवनातल्या अगदी शेवटच्या दिवशी दुपारी तीन तास त्यांनी गुरुबंधूना संस्कृत व्याकरण शिकवले.

उत्तम फळे आणि फुले ज्या स्वाभाविकतनेे बहरतात, रानावनातील पशुपक्षी व वनचरे ज्या स्फूतिर्दायक पद्धतीने विहार करतात तसेच आपल्याही जीवनात घडले पाहिजे, असे ते म्हणत.

त्यांचा कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग हे जीवनसिद्धीचे मार्ग होते. अंगभूत क्षमतांचे सहज स्वाभाविक विकसन आणि आविष्करण म्हणजे योग, असे स्वामीजी मानत. काही विषयांना शीर्षकांमुळे गहनता व गांभीर्य प्राप्त होते. स्वामीजींना अगम्यतेचे वावडे होते. आकाश अथांग आणि निरभ्र राहू शकते. आपले मानससरोवर असेच सखोल व निश्चल असावे. त्यातच आत्मरूपाचे प्रतिबिंब घडावे. ही अनुभूतीची पौणिर्मा हा समाधानाचा कळस होय. गरिबाच्या झोपडीवरसुद्धा हा कळस चढू आणि शोभू शकेल. विवेकानंदांनी अमेरिकेतील अनेक अभ्यास मंडळांपुढे व्याख्याने दिली. त्यांच्या विवेचनातील सूत्रे सुगम होती. ते म्हणत : Each man should have the perfect exercise of his individuality... In every religion there is the essential truth and non-essential casket in which this jewel lies.

आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रकटीकरण व आविष्करण हा एक आनंदोत्सव आहे. या उत्सवाच्या नानाविध वर्तनशैली सिद्ध करणे हेच विविध धर्मांचे कार्य होय.

भारत हे धर्मशैलीसंपन्न राष्ट्र आहे.

अमेकिा हे तंत्रविज्ञानसमृद्ध जग आहे.

या उभय लोकसमुदायात संवाद साधणे हाच एक अभिनव योग ठरणार आहे.

व्यक्तीला समचित्त करणे व समुदायाचा समतोल सांभाळणे हा एक अभिनव योग आहे. स्वामीजी हे या अभिनव योगाचे आचार्य होते.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले