आज विवेकानंद असते तर?  - प्राचार्य शिवाजीराव भोसले

आज विवेकानंद असते तर? ते आज नाहीत, ही वस्तुस्थिती आहे; पण एवढ्यातून ते आहेत, असे क्षणभर गृहीत धरले तर त्यांनी काय केले असते? ते राजकारणात पडले नसते; पण त्यांनी देशकारण सोडले नसते. धर्मकारण केले असते; पण ते राजकारणाच्या वाटेवरून चालवले नसते.

माणूस व त्याचे कल्याण, आत्मबोध आणि आत्मशोध, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक सुसंवाद या संकल्पनाचा जागर केला असता. विश्व हेच एक राष्ट्र मानावे आणि विश्वबंधुत्व हा युगधर्म व्हावा, असा आग्रह धरला असता. पहाटे उठणे, ध्यानधारणा करणे सोडले नसते. 'जीव हाच शिव' हा मंत्र तसाच ठेवला असता. आधुनिक शरीरविज्ञान अधिक अगत्यपूर्वक अभ्यासले असते.

जीवनाचे जे अंतिम प्रयोजन त्यांनी त्या वेळी गृहीत धरले त्याचे प्रतिपादन तेवढ्याच उत्कटतेने केले असते. Each soul is potentially Divine; The goal is to realise this Divinity हा मंत्र तसाच जपला असता.

अनेक राजकीय पक्ष, नेते आणि सामाजिक संस्था यांनी त्यांना आपल्या गोटात आणि गोत्रात, आपल्या गटात आणि पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला असता. स्वामीजी या सर्वांपासून दूर राहिले असते.

त्यांनी विज्ञानाचा अंगिकार एक विचारपद्धती म्हणून केला असता; पण तंत्रविद्येचे गुंते आणि तिढे टाळून सरल जीवनाचा पाढा म्हटला असता.

मनुष्यत्वाचे श्रेष्ठत्व हे पायाभूत मूल्य मानून धर्मचक्रप्रवर्तन केले असते. मोजक्या नेत्यांच्या लहरीवर सर्वांचे भाग्य अवलंबून ठेवण्याच्या धोरणाला खीळ घातली असती. जातीयता, प्रांतीयता, पक्षांधता या व्याधीपासून माणूस मुक्त राहावा असा प्रयत्न केला असता.

राजसत्तेच्या संदर्भात त्यांनी पूवीर्च व्यक्त केलेले विचार पुन्हा तसेच मांडले असते. राजसत्ता ही धर्मप्रतिपादकांकडून क्षत्रिय आणि व्यापारी यांच्याकडे पावले टाकीत शेवटी ती श्रमिकांच्या व दलितांच्या दारात येऊन थांबेल, हेच भविष्य पुन्हा एकदा लोकांच्या कानी घातले असते.

भारताचे खरे भाग्यविधाते समाजाच्या तळाशी आहेत. उद्याचे राज्यकतेर् तेच आहेत याचे सर्वांना भान असावे, असे निक्षून सांगितले असते.

या तळागाळातील समाजाला ज्ञान द्या, शिक्षण द्या, जनसामान्यांना सुविधा पुरवा. त्यांचे खेळणे करून त्यांना आपल्या स्वार्थाच्या परीघात फिरवू नका. धर्मांध होऊ नका. पक्षांध होऊ नका. ''राष्ट्रदेवो भव'' हा मंत्र जपा. झोपडपट्टीतील उघडीवाघडी पोरे आणि लक्तरे ल्यालेल्या मायभगिनी यांच्या मुखातून बाहेर पडू द्या एकच उद्गार ''अहम् ब्रह्मा अस्मि''.

लेखक, संशोधक, समाजसेवक, पत्रकार यांनी परस्परांना सन्मुख व्हावे. एकच गाणे गावे. तेच आपले राष्ट्रगीत ठरावे.

विवेकानंदांसारखा उमद्या मनाचा तपस्वी ही केवळ भारताची नव्हे; तर अखिल मानवकुलाची गरज आहे.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले