सध्याचा काळ अनुकूल आहे. परदेशी जाण्याचा निर्णय घेणे व
तेथे जाऊन दाखल होणे या दोन गोष्टींतील अंतर कमी झाले आहे. जहाजांची जागा
विमानांनी घेतली आहे. हवाई नौका अस्मानभरारी घेतात आणि वायुवेगाने संकल्पित
स्थळी पोहोचू शकतात. कधी निघावयाचे? कोठे व केव्हा पोहोचावयाचे? नंतरचे
थांबणे कोठे? अशा या प्रश्ानंची उत्तरे समोर ठेवूनच हालचाली घडत राहतात.
परदेशगमन ही आता एक कवायत झाली आहे.
विवेकानंदांच्या काळी ती एक अडथळ्यांची शर्यत होती.
त्यांनी ती पुरी केली. पण अमेरिकेत पोहोचल्यावर तेथे वेगळ्या अडचणींची परवड
सुरू झाली. ज्या सर्वधर्म परिषदेत ते सहभागी होऊ इच्छित होते, त्या परिषदेची
दारे केव्हाच बंद झाली होती. विविध धर्मसंस्थांनी आपल्या प्रतिनिधींची
निश्चिती व नावनोंदणी करावयाची मुदत टळून गेली होती. ज्यासाठी एवढा अट्टहास
केला, ते उरले नव्हते. स्वामीजी शिकागोला पोहोचल्यावर त्यांनी तेथे पाय केवळ
टेकणे, मागेपुढे पाहणे, थोडी विश्रांती घेणे व मग आपला मोहरा परत फिरवणे
एवढाच अनुक्रम जरी गृहीत धरला, तरी काही दिवसांचा रहिवास अटळ होता. जवळ
असणारे पैसे व हॉटेलचे दर यांचे गणित मांडून, चार दिवस थांबून, जे दिसेल
तेवढेच पाहून मग विचारपूर्वक स्थलांतर करू, असे त्यांनी ठरविले. या शताब्दी
सोहळ्याच्या निमित्ताने अमेरिकेत दिवाळी सुरू झाली होती. प्रदर्शने भरली
होती. पैशांच्या नवीन वाटा तयार होत होत्या. जगातून अनेक धनाढ्य अमेरिकेत
येऊन थांबले होते. आपल्याप्रमाणे सिमला, उटी, महाबळेश्वर, माथेरान यांसारखी
रम्य स्थाने तिकडेपण होती. वाहत्या पैशाला वाटा सापडत होत्या. अवघे लोकजीवन
आनंदाने सळसळत व खळखळत होते.
अशा क्षणी स्वामीजींजवळ पैसे नव्हते.
समोर नेमकी वाट नव्हती. ज्या परिषदेचा ध्यास घेऊन त्यांनी आपली अडथळ्यांची
शर्यत मोठ्या हिमतीने पुरी केली, ती परिषद दीड महिन्याने सुरू होणार होती.
तिच्यात वक्ता म्हणून बोलता येणार नव्हते. श्रोता म्हणूनदेखील बसणे शक्य
नव्हते. त्यांचे शिकागोला थांबणे संपले होते.
अशा स्थितीतही
परिषदेच्या कार्यालयाचे दार पुन्हा एकदा ठोठावून, प्रदर्शनाचा काही भाग
पाहून, शिकागोचा महागडा रहिवास संपवून स्वामीजी बॉस्टन या बाजूच्या गावी
गेले. अमेरिकेतील त्या आणीबाणीच्या काळात श्रीमती सनबर्न नावाच्या कोणी एक
विदुषी स्वामीजींना भेटल्या. या सहज भेटीने योगायोगांची एक मालिका सुरू झाली.
स्वामीजी आपल्या आथिर्क अडचणीमुळे सनबर्नबाईंच्या निमंत्रणाचा स्वीकार करून
त्यांच्या शेतमळ्यात असणाऱ्या एका बंगल्यात जाऊन थांबले. त्यांच्या एकूण
जीवनयात्रेत नियोजनापेक्षा नियतीनेच अधिक काही केले. सनबर्नबाई एक
प्राध्यापिका होत्या. आनंदी, उत्साही व समाजशील होत्या. त्यांचा एक पत्रकार
भाऊ असाच सव्यसाची होता. त्या दोघांमुळे तिसऱ्याच एका विद्वानाशी स्वामीजींचा
परिचय झाला. हार्वर्ड विद्यापीठात ग्रीक भाषा व तत्त्वज्ञान या विषयांचे
प्राध्यापक असणारे प्रा. जे. एच. राईट हे चचेर्त रमणारे एक चिकित्सक विद्वान
होते. अमेरिकेत आठवड्यात दोन दिवस हक्काचे व सुट्टीचे असतात. ते व्यक्तिगत
स्वातंत्र्यदिन असतात. कामाच्या वेळी काम हाच राम, असे समजणाऱ्यांना निष्काम
होता यावे यासाठी स्वीकारलेली ही सुखदायक व्यवस्था असते. प्रा. राईट यांचा
आणि स्वामीजींचा परिचय या सुट्टीच्या काळात सनबर्न कुटुंबाने घडवून आणला. दोन
विचारी अभ्यासक जवळ आले. चचेर्चे चंदन उगाळले गेले. अर्थपूर्ण प्रमेयांचा
परिमळ वाढत चालला. स्वामीजींचे व्यक्तिमत्त्व, भाषाप्रभुत्व, व्यासंग यांनी
प्रभावित झालेले प्रा. राईट स्वामीजींना सहज म्हणाले : ''वैखरीचे वरदान
लाभलेला असा विद्वान मी पाहिला नाही.'' एवढ्या अभिप्रायावर भागले नाही.
प्राध्यापक महाशयांनी स्वामीजींना आग्रह केला की, त्यांनी सर्वधर्म परिषदेत
सहभागी व्हावे. हा केवळ वरवरचा भाग नव्हता. तो एका अधिकारी व समाजमान्य
विचारवंताचा अट्टहास होता.
पण हे कसे शक्य होते? स्वामीजींनी जे
अनुभवले ते प्राध्यापकांना समजावून दिले. सगळी दारे बंद आहेत. पुढे मार्ग
उरला नाही. आता त्या दिशेने जाणार कसा? अमेरिकेस आलो ते परिषदेसाठी. पण
तांत्रिक अडचणींची धोंड वाटेत आली. कायम बंद झालेले दार ठोठावून उघडणार आहेच
थोडे?
प्रा. राईट विवेकी होते. निश्चयी होते. नियमपालनाचे महत्त्व ते
जाणत होते. पण नियमापेक्षा तत्त्वाला महत्त्व असावे, अशी त्यांची धारणा होती.
धर्म परिषद तरी कशासाठी? विचारमंथनासाठी ना? मग विचारवंताला तिची दारे बंद
असावीत का? प्रा. राईट यांनी तातडीने परिषदेशी संपर्क साधला.
कार्याध्यक्षांचे लक्ष वेधले.
या अभिप्रायाने प्रभावित झालेले
परिषदेचे पदाधिकारी अंतर्मुख झाले. त्यांनी औपचारिकतेचा अडसर बाजूला केला.
विवेकानंदांचा मार्ग मोकळा झाला.
बॉस्टन परिसरातील आपले अनपेक्षित पण
सुखद वास्तव्य संपवून स्वामीजी परत शिकागोला गेले. प्रा. राईट यांनी त्यांना
गाडीचे तिकीट काढून दिले. हाती थोडी रक्कम ठेवली. शिकागोला गेल्यावर प्रथम
कोणत्या भागात व कसे जावयाचे ते समजावून दिले. बरोबर एक लहानसा आराखडापण
दिला. स्वामीजी अपरात्री शिकागोला पोहोचले. स्टेशनबाहेर पडले. त्यांचा
गहाळपणा पुन्हा एकदा वाटेत आडवा आला. प्रा. राईट यांनी दिलेला कागद व
त्यावरचे पत्ते कोठे तरी हरवले. वेळ रात्रीची! कोठे जावयाचे ते सांगता येत
नव्हते. थंडी वाढत चाललेली. स्वामीजींनी अशी दुरवस्था यापूवीर् अनुभवली होती.
असे उघडे पडणे त्यांना नवीन नव्हते.
शेवटी त्यांनी शांतपणे बाजूला
असलेल्या एका गाडीच्या मोकळ्या डब्यात मुक्काम ठोकला. त्यांनी राजवाडे,
मंदिरे, धर्मशाळा, मठ, झोपड्या यांपूवीर् पाहिल्या होत्या. हे नवे निवासस्थान
म्हणजे अंधारयात्रेतील एक तात्पुरते स्थानक होते. स्वामी रात्रभर अर्धनिदित
दशेत तसेच तिष्ठत राहिले.
उरली रात्र सरली. काळोखाचा पडदा दूर झाला.
पुरते उजाडले. समोर प्रकाश पडला. स्वामींची शोधाशोध सुरू झाली. एवढा
महाज्ञानी आणि महायोगी पण त्याला पत्ता आठवेना. पावले पडत होती. पण वाट सापडत
नव्हती. आत्महीन व आत्मस्थित अशा योग्यांचे विस्मरण हीसुद्धा एक समाधीच असते.
सकाळ झाली. लोकांच्या हालचालींना वेग आला. स्वामीजींनी चौकशीच्या
मार्गाने अडखळत पुढे जात राहावयाचे, असे मनाशी ठरविले. पण चौकशी तरी करणार
कशी? सकाळी घरे व त्यांची प्रवेशद्वारे बंद. रस्त्यावर कोणी रिकामा माणूस
नाही. प्रगत समाजाची निर्मनुष्यता त्यांनी पाहिली. अमानुषतेची बहीण म्हणून
शोभावीशीच ती वाटली. एवढ्यात समोरच्या बंगल्यातून एक भगिनी बाहेर आल्या.
त्यांनी तर्काने जाणले की हा एक वाट चुकलेला धर्मात्मा आहे. त्याला
धर्मपरिषदेचा पत्ता हवा आहे.
बाईंनी स्वामींना विनंती केली. 'प्रथम
माझ्या घरी चला, नंतर पुढचे पाहू.' या बाईंचे नाव होते सौ. जी. डब्ल्यू. हेल.
या बाई आणि त्यांचा अखिल परिवार सतत स्वामीजींच्या पाठीशी राहिला. अनपेक्षित
अशा क्षणभेटीला चिरंतन स्नेहाचे वैभव प्राप्त झाले.
( क्रमश:)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले